औरंगाबाद: चोरट्यांनी काल मध्यरात्रीच्या अंधारात तीन दुकानांना लक्ष्य करीत रोकड लंपास केल्याची घटना चितेगाव येथे आज सकाळी उघडकीस आली. या घटनेतील चार ते पाच चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
औरंगाबाद-पैठण मार्गावरील चितेगाव येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या समर्थ ज्वेलर्स, आरोही मेडिकल, सागर प्रोव्हिजन्स या तीन दुकानांना काल मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. तोंडाला रुमाल बांधून या चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला.
चोरट्यांनी आरोही मेडिकलमधील रोख २५ हजार रुपये लंपास केले. सागर प्रोव्हिजन्स या किराणा दुकानाचे चोरट्यांनी कुलूप तोडले. मात्र, कुठलाही ऐवज दुकानातून चोरी गेलेला नाही, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. समर्थ ज्वेलर्स या दुकानातील साहित्याचा पंचनामा सुरू असल्याने नेमका किती ऐवज चोरीला गेला हे मात्र कळू शकले नाही.बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता परिसरात असलेल्या मंडलिक ज्वेलर्स या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात चोरटे कैद झाले असल्याचे दिसून आले. चार ते पाच चोरांची ही टोळी असून, सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. ज्या दुकानात चोरी झाली, त्या दुकानमालकांचे जबाब नोंदविण्याचे काम दुपारपर्यंत सुरू होते. या घटनेमुळे व्यापार्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे.